पहिलं प्रेम भाग ४: First Love story
या कथेचा भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १
“काल मला त्याचा फोन आला होता, विचारात होता कशी आहेस कुठे आहेस?”
माझं काळीज अचानक हातात आलं, क्षणार्धात मी माझ्या वास्तव जीवनात येऊन ठेपलो.
“मग, तू काय सांगितलं?”
“मी बोलले त्याला, मी मजेत आहे, पण तू का फोन केला मला? करायचं नाही असं ठरलंय ना आपलं!”
“मग?”
“मी बोलले त्याला पुन्हा मला फोन करू नकोस आणि विनाकारण काळजीही करू नकोस.”
काळीज पुन्हा जागेवर ठेऊन दिलं, बरं वाटलं जरा. पण पुन्हा विचार आला, त्याला तर अजूनही काहीतरी वाटतं हिच्याबद्दल. मी पुन्हा तो विषय टाळला.
कसं असतं, एखादा विषय उलगडल्यावर जर आपल्यालाच त्रास होत असेल तर तो टाळलेलाच बरा, पण गोष्टी फक्त टाळल्या म्हणून त्यांचं अस्तिव संपत नाही हे तेवढंच खरं.
पहिलं प्रेम भाग ४: First Love story Marathi

“जाऊदेत, तू बरी आहेस का? तू त्याला सरळ ब्लॉक का नाही करून टाकत?”
“हो मी बरी आहे, आणि त्याला ब्लॉक केलं काय आणि नाही केलं काय, तो संपलेलाच विषय आहे.”
विषय संपला आहे तर कर ना ब्लॉक, का विनाकारण त्रास.(तुलाही आणि मलाही)
“काय ग, काय विचार करतेय?”
“काही नाही रे, बरं झालं तू तरी आहेस म्हणून माझं डोकं शांत आहे, तू जर नसता तर आज माझा दिवस कसा गेला असता काय माहीत!”
“मी बोललो ना तुला, तू निश्चिंत रहा, आणि मला सुरवातीला जशी भेटलेली तशी खुश राहा.”
“किती मस्त बोलतोस अरे, मला कळत नाही तुझ्या आयुष्यात अजून कसं कोणी आलं नाहीये, पण एकवेळ ते चांगलसुद्धा आहे, त्रासापासून लांब आहेस तू.”
आजपर्यंत कोणी आलं नाही कारण तू यायची होतीस म्हणून.
तिच्या त्या बोलण्याने मी सुखावलो, मी देखील कोणालातरी चांगला वाटतोय याच समाधान माझ्या चेहऱ्यावर होतं. पण आजच्या गोष्टींमुळे नक्की मी खुश व्हावं की नाराज हेच कळत नव्हतं. त्याचा तिला आलेल्या फोनमूळे मी चिंतीत झालो होतो, पण नंतरच्या तिच्या एकंदर बोलण्याने ती चिंता दूर देखील झाली होती.
मग इकडतीकडच्या गप्पा करून मी तिला हासावण्याचा प्रयत्न करत होतो आणि काही वेळानंतर मी तिला सोडून घरी परतलो.
एवढ्या दिवसांत ती माझ्या आयुष्यातलं पाहिलं प्राधान्य झाली होती, बाकीचं जग एक गोष्ट आणि ती म्हणजे एक. पण ती देखील असा विचार करत असेल का? किंबहुना तिच्या मनात नक्की काय असेल तिच्या आयुष्यात मी तिला देतो तेवढं माझं देखील महत्त्व असेल का? असे अत्यंत गंभीर प्रश्न मला पडले होते, आणि मी एखाद्या अडाणी माणसाप्रमाणे ‘नाही समजले’ म्हणून सोडून दिले.
पण ह्या दिवसांत आपण पुढच्या माणसासाठी जेवढं करतोय तेवढीच अपेक्षा पुढच्या व्यक्तीकडून असते, आणि ही गोष्ट विचार करताना चुकीची असली तरी ती त्या काळात जगताना खूप हवीहवीशी वाटते.
पहिलं प्रेम भाग ४: First Love story Marathi
आता तर मला इतकी शक्ती आली होती की तिला मी कोणत्याही मनस्थितीतून बाहेर काढेलच. आमची ओळख होऊन जवळपास एक महिना झाला होता, आणि सहवासाला एक पूर्ण जन्म. ते म्हणतात ना ओळख आताची असली तरी नातं जन्मोजन्मीच आहे. गेल्या महिन्याभरात मी ‘नोकरी शोधणे’ हा प्रकार बाजूला ठेऊन ‘संसार थाटने’ हा प्रकार जोपासला होता. आणि माझ्या मते मी त्यात यशस्वी होताना दिसत होतो(स्वतःलाच). आता तिने जरी माझ्याजवळ तो विषय काढला तरी मी तो क्षणात टाळून ‘आयुष्यावर बोलू काही (आपल्या दोघांच्या)’ हा विषय घेऊन यायचो. तिने माझी केलेली प्रत्येक स्तुती मला आवडायची. मी बाकी मुलांपासून कसा वेगळा वागतो किंवा आहे ह्या फरक स्पष्ट करा प्रश्नावर हजारो मुद्दे मांडले होते. दोन तीन दिवसांनी का होईना आता तिला भेटल्याशिवाय राहवत नव्हतं. मला तिची ओढ लागली होती. तिने मला भेटायला बोलवावं आणि मी सगळं जग पालथं घालून तिला भेटायला जावं एवढं आयुष्य तिने माझं ग्रासलं होतं. पण त्याच वेळी तिला काय वाटत असेल याचा विचार मनात यायचा, आता तिच्या आयुष्यात देखील मी एकटाच एवढ्या जवळ आहे याचा मला प्रचंड आनंद होता.
ह्या काळात माणसाला आपण नक्की कुठे उभे आहोत? आणि आपल्याला जायचं कुठे आहे? या दोन्ही गोष्टी माहीत नसतात, फक्त उभं राहता तर येतंय ना! यामध्येच तो समाधानी असतो.
पण आता नुसतं भेटून जमत नव्हतं, तिला घेऊन मस्त कुठेतरी फिरायला जावं असं वाटायचं(वाढलेल्या अपेक्षा). पण ती तयार होईल का? विचारून तर पाहू, पण असं लगेच कसं, आणि माझ्या एकट्याबरोबर? थोडा वेळ हा विचार बाजूला ठेवला. पण तेवढ्यात माझ्या मेंदूतील आइन्स्टाइन जागा झाला आणि मला एक युक्ती सुचली. तिला मेसेज केला,
“परवा काही काम आहे का तुला?”
ती बराच वेळ ऑनलाइन होती पण माझा मेसेज तिने वाचलाच नव्हता, मी पुन्हा एक मेसेज केला,
“हॅलो, परवा काही कामात आहेस का?”
दोन मिनिटांनी तिचं उत्तर आलं,
“नाही, का रे?”
आता त्या उत्तरापेक्षा मला एवढा उशिरा उत्तर आलं ही गोष्ट खात होती, कोणाशी बोलत असेल ती? त्याच्याशी? पण तू मला उशिरा मेसेज का केला एवढं विचारण्याची हिम्मत नाही झाली.
“मी आणि माझे मित्र फिरायला चाललोय म्हणून म्हटलं तू सुद्धा येशील का?”
पुन्हा उशिराने उत्तर आलं,
“किती लोक आहेत नक्की?”
मला ह्या संभाषणापेक्षा तिच्या उशिरा येणाऱ्या उत्तराने चिंतेत टाकलं होतं.
पहिलं प्रेम भाग ४: First Love story Marathi
“दोघे तिघे असू, आणि एक मुलगी सुद्धा आहे. जमेल का तुला?”
परत एकदा मला उत्तराची वाट पाहावी लागली, आता मात्र माझा ताबा सुटला होता,
“दुसरं कोणी बोलतंय का ग? मला उशिरा उत्तर येतंय म्हणून विचारलं!”
“हो उद्या सांगते मी जमेल की नाही नक्की, अरे आमचा क्लासमेट चा एक ग्रुप आहे त्यावर जरा गप्पा मारत होते, पण तू बोल ना.”
“बरं बरं, काही नाही तेवढंच विचारायचं होतं. ठीक आहे कळव पण जेवढं लवकर जमेल तसं.”
म्हणजे मी माझी सगळी दुनियादारी सोडून फक्त तुझ्याशी बोलतोय आणि तू मात्र तुझ्याच दुनियेत आहेस. ह्या क्षणी मला ती माझ्यापासून किती लांब आहे हे समजलं.
त्या मेसेज नंतर तिचा एकही मेसेज नव्हता, पण ती मात्र ऑनलाइन होती. ह्या काळात माझ्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू झालं. जाउदे मी का एवढा विचार करू, मी सुद्धा दुसरीकडे बोलू शकतो, पण खरं पाहायला गेलं तर गेल्या महिन्याभरात मी कोणाशीच बोलत नसल्याने तिथेही बोलण्याची संधी नव्हती. मग थोड्या वेळात तिचाच मेसेज आला,
“काय करतोय? जेवलास का?”
तिने कितीही उशिराने मेसेज करू देत, मी मात्र अगदी वेळेच्या आधी उत्तर देऊन मोकळा,
“बसलोय ग, आताच झालं जेवण. आणि तू?”
“मी काही नाही, जेवायला बसेल आता.”
“ठीक आहे जेऊन घे मग बोलू.”
“हो बाय.”
मी तिच्या मेसेज ची वाट पाहत होतो, आणि एक तासाने तिचा मेसेज आला,
“जेवले मी, बोला.”
“काही ठरलं का मग परवाचं?”
“हो, जमेल मला, फक्त नक्की कुठे जायचय आणि किती वेळ लागेल तेवढं सांग.”
थोड्या वेळापूर्वी मनात आलेल्या वादळाला शांतता मिळाली. अचानक सकारात्मकतेचा वर्षाव झाला आणि मी तिच्याशी पुन्हा आतुरतेने बोलू लागलो,
“लांब नाहीये, सकाळी आठ वाजता निघू म्हणजे संध्याकाळी चार-पाच पर्यंत परतू.”
“ठीक आहे, जाऊयात मग.”
जस मला हवं होतं तसच घडलं, आता फक्त नजर लागून होती परवा सकाळच्या आठ वाजताच्या वेळेवर.
पहिलं प्रेम भाग ४: First Love story Marathi
उद्या सकाळी जायचं म्हणून मी आनंदी होतो, आणि मी तिला फोन केला,
“ऐक ना एक छोटी अडचण झालीये, माझ्या मित्राचं अचानक यायचं रद्द झालं ग.”
“आणि मग आता?”
“मला नाही माहीत, पण मी खूप नाराज झालोय ग.”
“अरे नाराजीचं काय त्यात, पुन्हा कधीतरी जाऊ ना.”
“ते होईल तेव्हा होईल, पण उद्या सकाळी जायचं म्हणून मी खूप उत्साहात होतो.”
अजून मला तिला आपण दोघे जाऊ असं विचारायची हिम्मत झाली नाही.
तेवढ्यात तिचाच मेसेज आला
“एक काम करू ना, आपण दोघे जाऊ नाहीतर, आणि ऐन वेळी कोणी आलंच तर चांगलच आहे.”
बापरे! नक्कीच ह्या जगात देव आहे, आणि तो सध्या माझ्या आसपासच असावा. माझं वाक्य तिने चोरलं.
“तुला चालेल ना माझ्यासोबत?”
“चालेल म्हणजे काय अरें, जाऊ आपण उद्या, तसही घरी बसून करणार काय!”
माझ नियोजन यशस्वी झालं. मला काही आज रात्रभर झोप येणार नव्हती, पोटात गुदगुल्या आणि ओठांवर हसू. आवडती भाजी असून देखील जेवलोच नाही, पोट आज मनापासून भरलं होतं.
पहिलं प्रेम भाग ४: First Love story Marathi
सकाळ झाली मी पटकन आवरून तिला घ्यायला निघालो, तीला फोन केला,
“हॅलो, मी आलोय खाली, ये लवकर.”
“हो आलेच!”
ती खाली येताना दिसली, पुन्हा नव्याने.
येऊन थेट गाडीवर बसली,
“चल!”
“हो चला!”
मी आज इंग्लंड ला सुद्धा जायला तयार होतो, तेवढ्यात तिने गाडी थांबवायला सांगितली,
“काय झालं?”
मी घाबरतच विचारलं, ती यायचं रद्द करतेय का काय याची भीती अजून होती मला.
“माझा मोबाईल तुझ्या खिशात ठेव ना, मला अडचण होते.”
“हो, दे ना.”
आणि पुन्हा निघालो, एके ठिकाणी पोटभर नाश्ता केला आणि हवं त्या ठिकाणी जाऊन पोहचलो.
जागा अगदीच निवांत होती, आजूबाजूला सह्याद्री आणि तिथून येणारा गार वारा, आम्ही तिथे एका कडेला जाऊन बसलो. तितक्यात माझ्या खिशातला फोन वाजला, तिचा फोन वाजला,
“तुला फोन येतोय.”
“कोणाचा आहे?” तिने विचारलं.
आणि मी तोंड वाकडं करत उत्तर दिलं, “मनोज चा.”…………………………….TO BE CONTINUED
पहिलं प्रेम भाग ४: First Love story Marathi
आपण वाचत होतात “पहिल प्रेम” या मराठी लघु कथेचा चौथा भाग. जर तुम्ही पुढील भागाची वाट पहात असाल तर आम्हाला नक्की कळवा आणि आमची हि कथा कृपया तुमच्या मित्रांशी शेअर करा.
Author – स्वप्नील खैरनार

स्वप्नील खैरनार यांचे आणखी लिखाण वाचा – Marathi Poem On Love
#Awesome story….# so interesting …. #waiting for next part…👌👌👍👍👍
Nice Story..!! waiting for next part…☺️😊👍
वाह! अप्रतिम लिखाण👍👌 मी सुद्धा अशा लघुकथा लिहितो, आपली कथा वाचून आनंद झाला. आतुरता पुढील भागाची
Aai shapath lay bhari story …….i m waiting 😍
Sadhya ti kay karte 😍😍
Nice Story waiting for next one
Kiti suspense….👌👌👌
Khup sundar…. Eagerly waiting for next part❤️❤️❤️
Waa😍😍