:::::—–::::::—–:::::—–::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::—-::::::——::::::—–::::
::- अभंग क्र.१०१६ -::

काय पुण्य राशी l गेल्या भेटुनी आकाशी l l १ l l
तुम्ही जालेति कृपाळ l माझा जी सांभाळ l l २ l l
काय वोळले संचित l ऐसे नेंणो अगणित l l ३ l l
तुका म्हणे नेंणे l काय केले नारायणें l l ४ l l
अभंग क्र.१०१६ – मराठी अर्थ तुकाराम महाराज गाथा
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात – माझ्या पुण्यराशी आकाशाचा भेद करून गेल्या की काय !।।१।।
कारण अहो संतजनहो, कृपाळू होऊन तुम्ही माझा सांभाळ केलात.।।२।।
संचित माझ्याकडे वळले की काय समजत नाही.।।३।।
हे नारायणानेच घडवून आणले की काय, हेही मला कळत नाही.।।४।। ( असे आश्चर्य महाराज व्यक्त करीत आहेत.)
श्रीसंत तुकाराम महाराज गाथा :- अभंग क्र.१०१६ -:
जय जय विठोबा रुक्माई l विठोबा रुक्माई l l जय जय विठोबा रुक्माई l विठोबा रुक्माई l l
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल l जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल ll
अभंग क्र.१०१६ मराठी अर्थ समाप्त
::- अभंग क्र.१०१७ -::

असे येथेचि या दिने l भाग्यहिने सकळा l l १ l l
भांडवल येवढे गाठी l नाम कंठी धरयेले l l २ l l
आणिक ते दुजे काही l मज नाही यावरी l l ३ l l
तुका म्हणे केला कोणे l एवढा नेणे लौकिक l l ४ l l
अभंग क्र.१०१७ – मराठी अर्थ तुकाराम महाराज गाथा
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात – “या परमार्थ विषयात मी अगदी भाग्यहीन आहे; हीनदीन आहे. याकरता मी देवाचे नाम मुखी धारण केले आहे. एवढेच माझे भांडवल आहे.।।१-२।।
यावाचून मी दुसरा साधन प्रकार जाणत नाही.।।३।।
असे म्हणून तुकाराम महाराज आश्चर्य व्यक्त करतात की- एवढे असूनही माझा एवढा नाम लौकिक कोणी केला ! खरोखरच मला कळत नाही.”।।४।।
श्रीसंत तुकाराम महाराज गाथा :- अभंग क्र.१०१७ -:
जय जय विठोबा रुक्माई l विठोबा रुक्माई l l जय जय विठोबा रुक्माई l विठोबा रुक्माई l l
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल l जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल ll
अभंग क्र.१०१७ मराठी अर्थ समाप्त
आपला सेवक:-
श्री ज्ञानेश्वर माऊली खंडागळे
मो:९९२१६००८३०
दि.०४/०८/२०२२
वार-गुरुवार
::::::::::- रामकृष्णहरी -::::::::::::::::