पहिलं प्रेम भाग 2: Love story Marathi

पहिलं प्रेम भाग 2: Love story Marathi

या कथेचा भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १

पहिलं प्रेम भाग 2: Love story Marathi


दुसरा दिवस उजाडला आणि आपोआप तो मोबाईल हातात आला, काही मेसेज आलाय का तिचा? पण तसं काहीही नव्हतं, जाऊदेत अजून उठली नसेल ती! म्हणजे सकारात्मक विचारांनी माझ्या पूर्ण शरीरात स्थान केलं होतं. मग पुन्हा मीच मेसेज केला. “गुड मॉर्निंग! ह्यव नाइस डे!” पण ह्या वेळी तात्काल तिकडून उत्तर आलं नाही. पण त्याची वाट मी मात्र एखाद्या गावाला जायच्या शेवटच्या बस प्रमाणे पाहत होतो. आणि तितक्यात मोबाईल वर काहीतरी वाजलं, क्षणार्धात मोबाइल हाती घेऊन मी पहिला तर कोणत्यातरी प्लॅन विषयी मोबाईल कंपनी चा मेसेज होता. मी रागात तो डिलिटच केला. आणि तेवढ्यात अजून एक मेसेज आला आणि घाईघाईने तोही माझ्याकडून डिलिट झाला. “अरे! कोणता मेसेज डिलिट केलाय तू?” मला खरंच याच उत्तर माहीत नव्हतं. तिचा असेल का? नाही दुसरा कोणाचातरी असेल. नाही पण तिचाच असेल असं वाटतंय. त्या एका गोष्टीने माझी धांदल उडवली. आता पर्याय एकच होता, थोड्या वेळाने जर तिचा मेसेज आला तर ठीक आहे, नाहीतर काहीतरी कारणाने मी तिला फोन करेलच. आणि मी एक तासभर वाट पाहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मला समजलं की एक तास म्हणजे नुसता एक तास नसतो, एक तास म्हणजे पूर्ण साठ मिनिटे आणि त्या प्रत्येक मिनिटात साठ सेकंद. बापरे! किती हा वेळ. आणि ती वेळ मोजत मी तो एक तास संपवला. आता मात्र मी तिला फोन करण्यासाठी पात्र झालो होतो. आणि मी तिला फोन लावला. बरोबर सहा रिंग गेल्यावर तिने फोन उचलला.

पहिलं प्रेम भाग 2: Love story Marathi

“हॅलो!”
“हो, हॅलो! ओळखलस का?”
“अरे हो, ओळखलं, बोल ना.”
“आताच उठलेली दिसतीयेस?”
“अरे नाही मगाशी तुला मेसेज केला तेव्हाच उठले होते.”
थोड्या वेळापूर्वीचा माझा हलगर्जीपणा सिद्ध झाला.
“फोन का केलेला?”
“अगं त्या इंटरव्ह्यूच काही कळलं का तुला?”
“अरे, नाही रे, पण ते म्हणाले होते की दोन ते तीन दिवसात कळवू म्हणून, पाहू अजून एक दिवस वाट.”
“हो पाहायला हरकत नाही, पण मला खरं सांगायच तर फोन येणार नाही असं वाटतंय, म्हणून मी दुसरीकडे सुद्धा प्रयत्न सुरू केलाय.”
“अरे वा, चांगलय की.”
“तू सुद्धा करून ठेव अर्ज, काय सांगता येतं कदाचित ते बोलावू पण शकतील.”
“बरं बरं, पण कुठे करू?”
“एक काम कर…..”
असं बोलून मी तिला सगळं हळुवारपणे समजावलं.

पहिलं प्रेम भाग 2: Love story Marathi


“हो चालेल, थँक यु.”
“अग, थँक यु काय त्यात. यापुढे असं काही समजलं तर सांगत राहील मी, काळजी नसावी.”
“हो नक्कीच, चला मी आवरते जरा बोलूयात नंतर.”
तिने तिकडून फोन कट कारेपर्यंत मी वाट पाहिली, कारण मला ते कट करण्याचं बटण मुद्दाम दिसलं नाही.
प्रसन्न वाटत होतं तो आवाज ऐकून, आणि मी एका वेगळ्या ग्रहावर प्रवेश केला होता.
थोडे दिवस अश्याच कामाच्या गोष्टी चालू होत्या, अजून कुठे इंटरव्ह्यू आहेत का? तुझं शिक्षण कुठे झालं? घरी कोण कोण आहे? इ. प्राथमिक गोष्टी आम्ही एकमेकांना विचारल्या. रोज काहीतरी कारणाने मीच तिला फोन करायचो. आणि ती देखील प्रत्येक वेळी खूप मस्त बोलायची. ह्या काही दिवसात तिने माझ्या आयुष्यात बराच वाटा घेतला होता. जे पांघरून मी विणायला सुरुवात केली होती त्या गाठी आता मी गुंफायला शिकलो होतो, फक्त त्या नक्की योग्य जागेवर बसत आहेत की नाही याकडे माझं लक्ष नव्हतं.

पहिलं प्रेम भाग 2: Love story Marathi

आजकाल तिचा विचार मी नेहमीच करत होतो आणि नकळत मला तिची आठवण येत होती आणि दुपारी न राहून मी तिला फोन केला,
“हॅलो, ओळखलं का?”
“अरे, तू विसरण्याचं कारण तर दे.” आणि ती हसली.
“काय करतेय?”
“काहीच नाही, ह्या रूममध्ये कंटाळा आलाय मला अगदी, आणि तू काय करतोय?”
“अग मी माझी बाईक गॅरेज ला घेऊन आलोय, ते नवीन नवीन आणावी लागते ना म्हणून.”
“नवीन? कधी घेतलीये?”
“झाला एखादा महिना.”
“मग तू सांगितलं नाही?”
“अग पण तेव्हा आपली ओळख नव्हती.”
“पण आता तर आहे ना, म्हणून मला पार्टी हविये तू बाईक घेतल्याबद्दल.”


ते ऐकून माझ्या मनात पूर्ण लाडूचा डबाच फुटला. पण तरीही अगदीच न समजल्यासारख मी असा गंभीर आणि निरागसपणे विचारलं,
“पार्टी कशाची आता, जुनी झाली ती गोष्ट.”
“अरे पण माझ्यासाठी नवीन आहे ना. बघ आता मला तर पार्टी हविये.”
बापरे, केवढा तो आग्रह, आता जास्त आटापिटा न घेता सरळ सरळ बोलतो,
“अच्छा, ठीक आहे, पण कुठे पाहिजे पार्टी? म्हणजे तुझं काही आवडतं ठिकाण वगैरे आहे का?”
“नाही नाही, अरे मी नवीन आहे इथे, तूच सगळं ठराव आणि मला सांग.”
“हो चालेल, थोड्या वेळात कळवतो तुला. आणि जमलं तर आजच जाऊयात.” माझं मन आणि शब्द एकाच वेळी ताबा सोडत होते.
“बर बर, चालेल, बाय!”
“हो बाय!”

पहिलं प्रेम भाग 2: Love story Marathi

क्षणभर थांबलो, काय घडतंय हे माझ्यासोबत? पण आता एवढा विचार करायला वेळ कोणाकडे होता? म्हणून मी लागलीच हॉटेल ची लिस्ट मनात तयार करून त्यावर विचार करू लागलो. इतरवेळी कोणी मित्राने जर मला असं विचारलं तर किती सहजपणे मी त्यांना नाव सांगून मोकळा व्हायचो, पण आता गोष्ट स्वतःची आहे तर मी विचार करू लागलो. आणि एक जागा मी ठरवली. चला तिला सांगून टाकतो. आणि थोड्याच वेळात तिला फोन करून जागा कळवली. संध्याकाळी सात वाजताची वेळ ठरली, आणि मी तिला घ्यायला जायचं ठरलं, काही जास्त नाही पण दहा पंधरा किलोमीटरवर असेल तिची रूम. आता सगळं ठरलं तर आहे, मग ड्रेस कोणता घालायचा आज? याआधी कुठेही बाहेर जायचं म्हटलं तर मी शॉर्टस् वर पण तयार असायचो. पण आज तू कट्ट्यावर बसायला किंवा अर्धा किलो बटाटे आणायला जाणार नाहीयेस हे ठाऊक होतं.
बरोबर पाच वाजता मी तयार होऊन बसलो. तिला फोन करून एकदा परत आठवून द्यावं का? का तिच्याच फोन ची वाट पहायची? हा जो चलबिचल करणारा काळ असतो ना, तो आपल्याला आपल्या इच्छा असतानाही त्यांना मारायला शिकवतो. म्हणजे मन आणि मेंदू यांमध्ये वादविवाद सुरू होतात. पण शेवटी आज मी मनाप्रमाणे वागायचं ठरवलं आणि मी पुन्हा तिला फोन करून एकदा आठवण करून दिली. एका ठिकाणी बसवत नव्हतं, मनात असंख्य प्रश्न येतजात होते. पार्टी तिने स्वतःहून मागितली, आणि ती यायला तयार देखील झाली. म्हणजे माझा तिच्या मनावर जो ठसा उमटवला तो योग्य आहे तर. म्हणजे मी अगदीच छोट्या गोष्टींचा विचार करून सगळं नियोजन (बोलण्याचं) करत होतो. सहा वाजले आणि मी तिने दिलेल्या पत्त्यावर जायला निघालो. वाटेत तिला एखादं फुल किंवा चॉकलेट घेऊन जाऊ का? पण जर मी घाई करतोय का? पण असं मोकळ्या हाताने कसं जायचं? आणि तिने त्याचा काही चुकीचा अर्थ घेतला तर? हेच विचार करत शेवटी मी रिकाम्या हातानेच तिथे पोहचलो. अजून सहा वाजायला पंधरा मिनिटे शिल्लक होती, आणि मी तिला खाली आलोय असा निरोप देण्यासाठी फोन केला. गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, तोंडावर जरा जास्त लागलेली पावडर, क्लिप मध्ये बांधलेले केस आणि चेहऱ्यावरच विलक्षण तेज. त्या दिवशी पाहिलेली ती आणि आज पाहिलेली ही ह्या दोघींमध्ये तिची आणि माझी ओळख एवढंच साम्य बाकी राहिलं होत.
“मस्त दिसतोय ड्रेस तुझ्यावर!”
“थँक यु! आई ने घेतलेला मागच्या महिन्यात.”
“चला निघायचं मग?”

पहिलं प्रेम भाग 2: Love story Marathi

आपण वाचत होतात “पहिल प्रेम” या मराठी लघु कथेचा दुसरा भाग. जर तुम्ही पुढील भागाची वाट पहात असाल तर आम्हाला नक्की कळवा आणि आमची हि कथा कृपया तुमच्या मित्रांशी शेअर करा.

Author – स्वप्नील खैरनार

Marathi Love Story

स्वप्नील खैरनार यांचे आणखी लिखाण वाचा – Marathi Poem On Love

Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा

11 thoughts on “पहिलं प्रेम भाग 2: Love story Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
23 + 19 =