काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी अजय रविंद्र श्रीखंडे यांची -छत्री आणि ती- हि कविता -पावसाळा आणि आठवणी- या विषयावर असून हि एक पाऊस कविता आहे
छत्री आणि ती | पाऊस कविता 2023

चालता चालता अचानक
पावसाची रिमझीम सुरू झाली,
घाईगडबडीनं मी ही
बॅगेतली छत्री उघडली…
वातावरण मस्त झालेलं
छान गारवा सुटलेला,
मित्र चहा पिताना
समोरच्या टपरीत दिसलेला…
जवळ गेलो चहा पिलो
गप्पादेखील रंगत गेल्या,
एकामागून एक एकामागून एक
दोन चार कटींग संपुन गेल्या…
घड्याळ्याकडं माझं चुकुन लक्ष गेलं
मी निघालो घाईघाईनं,
मला म्हणाला, “मी पण येतो”
छत्री आणलीच नव्हती बिचार्यानं…
नुसतं त्याच्याकडं बघीतलं तर
तो लगेच म्हणाला, “बील देऊन येतो”,
मी म्हटलं, “तोपर्यंत जरा
निसर्गाचा आनंद घेतो”
पावसाच्या धारा होत्या
सोसाट्याचा वारा होता,
समोर एक गोड मुलगी दिसली होती
बहुदा ती पावसात भिजली होती…
तिनं माझ्याकडं बघीतलं
मी तिच्याकडं बघीतलं,
डोळ्यांची खुनवाखुणवी झाली
तिही बिन्धास्त माझ्या छत्रीत आली…
तेवढ्यात मित्र माघारी आला
त्याला सगळा खेळ समजला,
हात हलवून गालातल्या गालात हसला
परत तो मस्तपैकी आडोशाला बसला…
आता छत्रीत फक्त
चिंब भिजलेली ती आणि
कोरडा कोरडा मीच होतो,
बहुदा दुष्काळानंतरचा पाऊस असावा
म्हणुनच मी इतका खुष होतो…
पावलागणिक पाऊल पडंत होतं
आमचं बोलणं वाढंत होतं,
कसलीच आधीची ओळख नव्हती
म्हणुनच कशाची भिती नव्हती…
ती थोडी चिटकली आणि
तिथंच जीव येडापिसा झाला,
बोलता बोलता नंबर घेतला
तिनंही तो हसत हसत दिला…
गप्पा अशा रंगल्या होत्या
पाऊस थांबलेलाच समजला नाही,
ती इतकी ओलीचिंब होती की
माझाही सदरा कोरडा राहीला नाही…
गारवा इतका होता की
दोघंही नुसतं कुडकुडत होतो,
वीज चमकली की अचानक धरायची हात
मी उगीच पुन्हा तो सोडवत होतो…
वातावरण ढवळलं
आमची धुसमुस अजुन वाढली,
धरसोड करता करता तिला
तिच्या मैत्रीणीजवळ सोडली…
जाताना तिनं तीन वेळा
मीही चार वेळा वळुन बघीतलं,
पाचव्यांदा वळुन बघितल्यावर
तिनंच आता जा म्हणुन सांगीतलं…
घरी गेल्या गेल्या आधी
तिला फोन केला,
काय माहीत कसा पण तिनंही
पहिल्याच रिंगला उचलला…
मग रोजच मी घरातुन
छत्री घेऊन बाहेर जायचो,
ती उगी रोजंच भिजायची
आम्ही पुन्हा एकाच छत्रीत यायचो…
असं करता करता अख्खा
पावसाळा संपुन गेला,
चिंब भिजलेल्या तिचं रूप
काळजात खोल कोरून गेला…
एकच थेंब नेमका राव
तिच्या कपाळावरून गळायचा,
नाकावरनं वाहत वाहत
थेट ओठात शिरायचा…
तशी मला कोरड पडायची
मलाही अचानक तहान लागायची,
तीही कधीकधी मला तो
थेंब चाखायला द्यायची…
दोन चार वर्षे मी
फक्त पावसाळा जगायचो,
छत्री वापरा छत्री वापरा
दुसऱ्यांनाही सांगायचो…
अचानक एका पावसाळ्यात
आम्ही आमच्या घरी सांगीतलं,
घरचे लग्नाला तयार झाले
आम्ही आभाळ कवेत घेतलं…
सगळं मस्त चालु होतं
हिवाळा उन्हाळा मस्त गेला,
बघता बघता पुन्हा नव्यानं
नवा पावसाळा आला…
ती काळजी घेते रे खुप
ऊगीच औषधं देत नाही,
कारण ऑफीसमधनं मी भिजुनच येतो
ती छत्री मात्र सोबत देत नाही…

छत्री आणि ती | पाऊस कविता 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
छत्री आणि ती | पाऊस कविता 2023