पहिलं प्रेम भाग 7 शेवट: Best Love Story in Marathi

पहिलं प्रेम भाग 7: Best Love Story in Marathi

सकाळी उठून लवकर तयार झालो आणि नेहमीप्रमाणे नेहमीच्याच जागेवर जाऊन पोहचलो. पाच दहा मिनिटे शांत बसून मी बोलायला सुरुवात केली,
“बोल काय सांगायचं होतं.”
“तू रागावणार नसशील तर सांगते, आणि आधी प्रॉमिस कर, तू चिडणार नाहीस.”
मला बऱ्यापैकी ती काय बोलेल याचा अंदाज येऊन गेला होता.
“हो, तुला आज काय बोलायचं ते सगळंच बोलून टाक, मी शांतपणे ऐकेल.”
“मी काल मनोजशी बोलले रात्री, तो आजारी होता, मला खूप कसतरी झालं त्याचा आवाज ऐकून, आणि त्याच्याशी एकंदर बोलल्यावर तो बराच बदललेला वाटला रे, खूप छान बोलत होता.”
मी आवंढा गिळत तिला विचारलं, “मग पुढे?”
“मी पुन्हा त्याच्यासोबत राहायचा विचार करतीये.”
उघड्या अंगावर एखाद्या धारदार तलवारीने माझ्यावर तिने वार केला. मला अशक्तपणा जाणवला सुरुवात झाली.
“आणि आजपर्यंत जे झालं ते? त्याच काय?”
“हो, झाल्या बऱ्याच गोष्टी, पण असं होतं असतं ना? आणि तसही मला सुद्धा येते त्याची आठवण, पाच वर्षे एकत्र आहोत आम्ही. जास्त वेळ एकत्र घालवला आहे आम्ही.”

पहिलं प्रेम भाग 7: Best Love Story in Marathi

त्या दिवशी मला एक गोष्ट स्पष्ट झाली,
‘तुम्ही कितीही प्रामाणिक आणि विद्वान असू द्या, कंपनीत शेवटी किती वर्षे अनुभव आहे ह्या एकाच गोष्टीचा विचार केला जातो.’

“हो, आहे पाच वर्षे एकत्र, पण तुम्ही पुन्हा वेगळे होणार नाही हे कशावरून.”
मी डोळ्यातल्या पाण्याला मिळेल त्या वाक्याने बांध घालत होतो. मी संपूर्णपणे तुटलो.
त्या दिवशी मन घट्ट करणे नक्की काय असते ही एक नवीन गोष्ट शिकलो.
“नाही रे, मला नाही वाटत तो पुन्हा तस वागेल, तेवढं ओळखते मी त्याला.”
“ठीक आहे, तुला जस योग्य वाटेल तसं कर, फक्त खुश राहा आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. चल मला घरी जायचय काम आहे.”
“एक विचारू का? तू बरा आहेस ना?”
“काय वाटतं तुला?”
“नाही माहीत, तू सांग ना.”
“मला सध्यातरी काही वाटत नाही, पण एक गोष्ट तुला सांगतो, गेल्या काही दिवसांमध्ये माझ्यात जो बदल झालाय त्याला फक्त ‘तू’ हे एकच कारण आहेस आणि त्यामुळे माझ्या जुन्या गोष्टी मी हरवून बसलोय, ज्यांची मला पुन्हा गरज पडणार आहे.”
आणि लगेच आम्ही घरी जायला निघालो.
‘मला काही फरक पडत नाही.’ हे एक वाक्य बोलायला मला तिच्यासमोर तेव्हा जी हिम्मत होती, ती घरी आल्यावर काहीवेळातच संपली. मी त्या दिवशी माझ्या खोलीत जाऊन मनसोक्त रडलो. खूप गोष्टी माझ्याच चुकल्या इतक्या दिवसांत असं मला वाटत होतं, आणि त्याच वेळी तिच्यासोबत घालवलेला वेळ जो एरवी मला आठवला की खूप आनंदी करायचा त्यानेच मला त्रास होऊ लागला. मी आता तिला भेटणार नाही, आणि मला होणारा त्रास देखील तिला सांगणार नाही. डोळे लाल झाले होते, या आधी मला आनंदात झोप लागली नव्हती, आता दुःखामुळे लागत नव्हती. तिने बाईक वर मारलेली मिठी खूप जास्त आठवत होती, आणि तिची खरी गरज मला आता होती.

पहिलं प्रेम भाग 7: Best Love Story in Marathi

काल मी ज्या शपथी घेऊन झोपलो होतो सकाळी उठल्याबरोबर विसरून गेलो आणि न राहवून तिला मेसेज केला,
“गुड मॉर्निंग.”
तिनेही लगेच मला रिप्लाय केला.
“कसा आहेस?”
“मला काय होणार, मजेत आहे, तू बोल.”
“मी सुद्धा छान!”
“तो मनोज देखील आनंदीच असेल नाही?” ती माझ्या आयुष्यात येवो न येवो, आमच्या बोलण्यात त्याचा विषय होणारच.
“हो, तो सुद्धा, आणि एक सांगू तुझ्यामुळे मनोज माझ्या पुन्हा जवळ आला, त्यामुळे थँक यू!”
“माझ्यामुळे? काय संबंध?”
“जेव्हा आपण फिरायला गेलो होतो तेव्हा आधल्या दिवशी मी त्याला तुझ्यासोबत फिरायला चालले सांगितलं होतं, त्याला खूप भीती वाटली की तुझ्या आणि माझ्यात काही आहे की काय, पण मी सांगितलं त्याला, तो अजिबात तसा नाहीये, आणि त्याच्यामुळेच मी स्वतःला सावरू शकले.”
ह्या तिच्या बोलण्याला उत्तर देण्यासाठी माझ्याकडे शब्द होते पण त्यांना आज मी त्रास देऊ शकलो नाही.
“चांगलं झालं म्हणजे, आहे मी काहीतरी कामाचा.” मी उपहासाने बोललो.
“असं काय बोलतोय”
आणि मी शांत बसलो. तिला कळतच नसेल का माझा त्रास? का वागत असेल ही अशी?
थोडा वेळ एकपात्री गप्पा झाल्या आणि मी कामात आहे नंतर बोलतो सांगून आवरायला सुरुवात केली.
माझ्या मनात खूप काही साचलं होत, पण बाहेर येतच नव्हतं. माझ्या अस्तित्वावर मला प्रश्नचिन्ह दिसत होतं. उपयोग काय आहे आपला? आता मलाच ह्या दिवसांत खांद्याची खूप गरज होती त्यामुळे मी माझं दुःख रश्मीकडे व्यक्त करू लागलो. एवढ्या काही दिवसांत रश्मी सोबत बोलणं व्हायचं, आणि मी माझ्या बऱ्यापैकी गोष्टी तिला सांगितल्या होत्या, तिलाही त्या आधीच माहिती होत्या जणू. आजकाल तिच्याशी बोलण्याच्या बऱ्याच वेळेवर रश्मीचा हक्क बसला होता, आणि माझ्या मनालाही अराम भेटला.
माझ्या खांद्यावर मी जे ओझं आजपर्यंत बाळगलं तेच मी रश्मीच्या खांद्यावर देत होतो. खांदा देण्याच्या गोष्टी अगदी मरेपर्यंत संपत नाहीत.
रश्मी कितीही चांगलं बोलत असली तरी माझ्या मनात तिच्याविषयीच चक्र सुरू असायचे. एकदा मी रश्मी सोबत फोन वर बोलत असताना तिचा फोन येत होता, मी लगेच रश्मीचा फोन कट केला आणि तिच्याशी बोलायला लागलो,
“कोणाचा होता फोन?”
“रश्मी होती, तिला मोबाईल विकत घ्यायचा आहे, ते विचारायला तिने फोन केला होता.” मी निरागसपणे खरं बोलत होतो.
“ती सध्या खूप फोन करतेय तुला?”
“खूप कुठे, काही काम असलं की येतो.”
“तसाही तिला तू आवडतोच ना.” ती अगदीच उपहासाने बोलली.
“मी तिला आवडतो? काहीही काय बोलतेय. असं होणारच नाही कधी, आणि मला नाही वाटत रश्मीला असं वाटत असेल.”
“अरे ती बऱ्याच वेळा मला बोलून जायची तुझ्याविषयी.”
“असेल बोलत मला काय.”
“जपून रहा जरा.” दबक्या आवाजात ती बोलली.
“हो अग, चल बोलूयात नंतर.” एवढं बोलून मी फोन ठेवला.
‘जपून रहा जरा.’ ह्या वाक्यात काहीतरी जळलेला सुगंध होता.
तिच्या रश्मीविषयीच्या बोलण्याने मला दुसऱ्या बाजूने देखील विचार करायला भाग पाडले होते. मी विचार करू लागलो, आज ज्या जागेवर तिच्यासाठी मी आहे म्हणजे रश्मी सुद्धा माझ्यासाठी सारख्याच जागी आहे का? खूप मोठा प्रश्न होता. मी रोज रश्मीसोबत बोलायचो आणि मला माझी छबी त्यात दिसत होती. पण माझा जीव अजून तिच्यावरच अडकून होता. मला तीच हवी होती, तिच्यासारखी सुद्धा नाही, फक्त तीच.
रश्मीची माझ्याविषयी असलेली ओढ मला वाढताना जाणवत होती, पण मी तिला नेहमी टाळायचो. किती सोपं असतं ना ते? तिने मला टाळल्यावर होणार त्रास माझ्यामुळे रश्मीला होतोय का?

पहिलं प्रेम भाग 7: Best Love Story in Marathi

खूप वेळा असं झाल्यावर मला अचानक तिची दया यायला सुरुवात झाली, अरे म्हणजे जेव्हा माझ्यावर ही परिस्थिती होती तेव्हा मला पुढच्या व्यक्तीकडून किती अपेक्षा असायच्या! आणि जर त्या पूर्ण झाल्या नाही तर होणारा त्रास सुद्धा मला माहित होता. मला अचानक ह्या गोष्टीं मनात येऊ लागल्या, आणि मी माझ्या चुका दुरुस्त करू लागलो.

‘आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यापेक्षाही आपल्यावर जो प्रेम करतो तो व्यक्ती कधीही महानच असतो.’

माझ्या आणि रश्मीच्या वाढत्या नात्याचा त्रास तिला होऊ लागला, आणि मला माझ्याविषयीच्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या. पण मी एक ठरवलंच होत, ज्या गोष्टींमुळे मला त्रास झाला त्या गोष्टींचा त्रास मी रश्मीला होऊ देणार नाही, आणि बघता बघता आमच्या दोघांतच एक खूप छान नातं तयार झालं, माझ्या अपेक्षेपूर्वीच सगळ्या गोष्टी मनासारख्या घडू लागल्या आणि पाहता पाहता मला माझं हवं असलेलं प्रेम भेटलं.
एकदा रश्मीला भेटलो तेव्हा तिने मला नकळत सांगून टाकले की तीच माझ्यावर प्रेम आहे. मला एकवेळ असही वाटलं की मी तिला फसवत तर नाही ना? पण ती जर तिच्या आयुष्यात तिने एखादा निर्णय घेतला असेल तर मी का नाही घेऊ शकत. त्या दिवसांत खूप विचार करून अखेरीस मी माझ्या संपूर्ण आयुष्याला रश्मीच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला. माझ्या त्या निर्णयामुळे रश्मीला झालेला आनंद गगनात मावेनासा झाला. मला सुद्धा एक हक्काचा काळजीवाहू व्यक्ती भेटला. पण तरीही माझ्या मनात तिच्याविषयीचे विचार येतच होते. तेव्हा मला तिच्या मनातील मनोज च्या ओढीचा अंदाज आला. पण कसं असतं काही गोष्टी डोक्याने जरी बरोबर वाटत असल्या तरी तेव्हा मनातल्या भावनांसमोर डोक्याची किंमत शून्य असते. पण आता काहीही करून मला रश्मीला कोणताही त्रास होऊ द्यायचा नव्हता आणि तरीही,

पहिलं प्रेम भाग 7: Best Love Story in Marathi

एके दिवशी मला तिचा फोन आला,
तिने मला विचारलं,
“भेटशील का मला एकदा?”
“का?” ह्या एक प्रतिप्रश्नामुळे मी किती सावरलो असेल याचा अंदाज तिला आला असावा.
“मला भेटायचंय तुला एकदा, भेटशील ना?”
ह्या वेळी मी रश्मी चा विचार करत होतो, तिला काय वाटेल मी जर भेटायला गेलो तर?
“बरं, मी विचार करून सांगतो तुला.”
पण खरं सांगायचं म्हणजे मलाही अचानक भूतकाळ आठवून तिला भेटण्यासाठी मनात पाल चुकचुकली होती. कारण आमच्या नात्यात मी जुनं पात्र होतो, ती आज मला नव्याने नातं जोडताना दिसत होती.
मी रश्मीला विचारलं आणि ती म्हणाली,
“हे बघ माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू तिला भेटू शकतो!”
ती हे बोलत असताना मला जाणवत होतं की तिच्या मनात काय चालू असणार. पण मग मी ही एकदा शेवटचं भेटायचं ठरवलं. तिला जागा सांगितली आणि मी भेटायला निघालो. ठरलेल्या ठिकाणी ती माझ्या आधी तिथे उपस्थित होती, आणि मी तिच्यासमोर आलो,

पहिलं प्रेम भाग 7: Best Love Story in Marathi

त्या क्षणाने जणू कित्तेक दिवस वाट पाहिली असेल…
समोर दिसताच हृदयात धडकी भरावी आणि ती देखील अगदीच अचानक. त्या डोळ्यांनी डोळे भिडवले, माझ्या अक्राळविक्राळ आठवणींनी त्यांमध्ये झेप घेतली, स्वतःच्या असण्याचा विसर पडत होता, भूतकाळ डोळ्यासमोर होता, त्या आठवणींच्या आक्रोशाची किंकाळी दोघांच्या शांततेत ऐकू आली, आठवणींच्या त्सुनामीने डोळ्यांमध्ये गर्दी केली आणि त्या प्रत्येक थेंबाने लाखो करोडो आठवणींची साक्ष दिली. माझ मन देखील त्या आठवणींच्या जाळ्यात अडकलं होतं, तो पहिला क्षण आणि शेवटचा क्षण यांमधला फरक स्पष्ट सांगत होतं, विलीन झालेल्या दिवसांची श्राद्ध देण्यासाठी तयारीत होतं, मलाही खूप काही आठवत होत, त्या स्पर्शाचे शहारे आणि त्या आठवणीने फवारे माझ्या अंगावर बागडत होते…

“प्रश्न माझ्या अगदीच समोर उभा होता,
आणि तिचे डोळे त्यांचं उत्तर सांगत होते…”।

पहिलं प्रेम भाग 7: Best Love Story in Marathi

तेवढ्यात ती बोलती झाली

“विसरलास वाटतं मला?”
“नाही ग, असा कसा विसरेल? बोल ना.”
“हल्ली फोन करत नाहीस तू? आणि मेसेज पण कधीतरी. काही राग आलाय का?”
“राग?” आणि मी हसलो. “अजिबात तसं काही नाहीये, आणि तुला एक सांगू, रश्मीने मला प्रपोज केलं, तू म्हणत होतीस ते खरं होतं.”
“काय सांगतोय, अरे वेडा आहेस का?”
“वेडा? असं का?”
“अरे म्हणजे असं कोणालाही तू तुझ्या आयुष्यात जागा देणार का? तू ओळखत नाही तिला संपूर्ण आणि एवढा मोठा निर्णय?”
“ओळखत नाहीस म्हणजे, तिने मला सगळं सांगितलंय तिच्याविषयी, आणि मला ते मान्य देखील आहे.”
“नाही तू असं नाही करू शकत, तू एकदा विचार कर ना!”
तिच्या त्या बोलण्यात मला भीती वाटली, तिला एवढ्या दिवसांत पहिल्यांदाच माझी इतकी काळजी वाटली होती. मी तिची वयक्तिक(मनोज विषयी) कोणतीही चौकशी केली नाही. ती तेव्हाही खूप दुःखात होती, आज जर मी तिला तीच दुःख व्यक्त करण्यासाठी खांदा दिला असता तर कदाचित मला ती भेटली असती. मला आज जाणवलं होत की तिने तीच माझ्यावरचं प्रेम एक अदृश्य रित्या का होईना व्यक्त केलं होतं आणि आज मला याचा आनंद वाटतं नव्हता, कारण ज्या विश्वासाने रश्मीने मला तीला भेटण्याची परवानगी दिली होती तो विश्वास मला तोडायचा नव्हता. तेव्हा मला एक गोष्ट जाणवली ज्या भावना घेऊन मी वावरलो होतो आज त्या भावनांमधून मी सावरलो होतो.
“तुला एक सांगू, मी यापुढे तुला कधीही भेटू शकत नाही, कारण मी तुला भेटल्याने रश्मीला त्रास होईल गं आणि तू मला भेटल्याने मनोजला, त्यामुळे तू तुझ्या जीवनात आनंदी राहा आणि मी माझ्या.”
“पण आपण मित्र म्हणून राहू शकतो ना?”
“ते तुला शक्य होईल गं, पण मला जमणार नाही ते.”
“का?”
“ह्या प्रश्नच उत्तर नाही माझ्याकडे!”
“हा तुझा खरंच शेवटचा निर्णय आहे?” तिने कळवळीने विचारलं.
“हो, अगदीच शेवटचा. तू सुद्धा काळजी घे आणि आनंदी रहा!”
“मला कळत नाही तू असं अचानक का वागतोय पण तुला माझ्यामुळे काही त्रास झाला असेल तर मला माफ कर.”
“तुझी चुकच नाही तर माफी का मागतेस?, फक्त एक गोष्ट नक्की सांगेल मनोज ला यापुढे कधीच एकटं सोडू नकोस.”

एवढं बोलून मी तिच्यासमोरून विरुद्ध बाजूला चालता झालो, तिच्या डोळ्यांत मी आजही अश्रू पाहू शकत नव्हतो. ती सवयच नव्हती मला.
हे सगळं बोलताना माझ्या मनावर असलेला दगड मी घट्ट दाबून ठेवला होता. कारण ज्या व्यक्तीमुळे माझ्या हृदयात ही नाजूक भावना तयार झाली होती ते हृदय आजची तिच्या भावनांची कदर करेल याची जाणीव मला होती.

आपल्याशी प्रामाणिक आईनंतर जर कोणी असेल तर ते आपलं हृदय असतं आणि ते सुद्धा नेहमी भावनेची बाजू घेतं.

मी माझ्यावर प्रेम करत असलेल्या व्यक्तीला आज न्याय दिला होता, त्या दिवसापासून तिनेही माझ्यावर कधी अन्याय होऊ दिला नव्हता. कस असतं आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती आपल्याला किती प्रिय असते हे आपण जाणतो. म्हणजे रश्मीसाठी मी अगदी तितकाच प्रिय असणार किंबहूना होतो जेवढा मी तिच्यासाठी एकेकाळी होतो.

त्या दिवशी मी तिला सगळ्याच बाजूने माझ्या मोबाईल आणि आयुष्यातून शेवटचं बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. परंतु अजून देखील तिच्या हक्काची एक आठवण ह्या हृदयात कायम असणार, ती आठवण मी सुद्धा कधीच पुसू शकत नाही हे मला समजत होतं.

नातं असच जपून ठेऊन आठवणी तू विसरून जा,
मनातल्या सगळ्या कोपऱ्यातून तू त्वरित निघून जा,
सांभाळ तू स्वतःला सहवास तू विसरून जा,
भेटली पुन्हा मला जरी ती जुनी ओळख तू विसरून जा ||

पहिलं प्रेम हे कधीच पूर्ण होत नाही तरीही ते इतकं आठवणीत का राहतं याचं कोडं उलगडण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे. मित्रांनो कथा आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की पोहचवा.

समाप्त….

पहिलं प्रेम भाग 7: Best Love Story in Marathi

आपण वाचत होतात “पहिल प्रेम” या मराठी लघु कथेचा शेवटचा भाग. आमची हि कथा कृपया तुमच्या मित्रांशी शेअर करा.

Author – स्वप्नील खैरनार

Marathi Love Story

स्वप्नील खैरनार यांचे आणखी लिखाण वाचा – Marathi Poem On Love

Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा

7 thoughts on “पहिलं प्रेम भाग 7 शेवट: Best Love Story in Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
8 + 15 =