पहिलं प्रेम भाग ६: Love Marathi story

पहिलं प्रेम भाग ६: Love Marathi story

या कथेचा भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १

“माहीत नाही, पण ती कालपासून घरची आठवण काढत होती, आणि जवळपास महिना होत आला ती घरी गेली नव्हती, मग गेली असेल बहुतेक त्यामुळेच.”
“पण मला तस काही बोलली नव्हती ती!”
“अरे अचानक ठरलं असेल, करेल ती फोन तुला, तू काळजी नको करू.”
“हो चालेल, बाय.”
कालच्या भांडणामुळे एवढं काय काय घडतंय अस मला वाटू लागलं. आता ती घरी असल्यामुळे माझं जास्त फोन करणं पण चुकीचच होतं. मग मी तिच्या फोन ची वाट पाहायला लागलो. आता जोपर्यंत तिच्याशी मी बोलत नाही तोपर्यंत माझं कोणत्याच गोष्टीत लक्ष लागणार नव्हतं. घरामध्ये माझ्याकडून चिडचिड होत होती, मी जरा विचित्रच वागत होतो. तेवढ्यात फोन वाजला, मी घाईघाईने तिच्याशी बोलायला घराबाहेर पडलो,

पहिलं प्रेम भाग ६: Love Marathi story


“हॅलो, अग कुठे आहेस?”
“हो सांगते, अरे सकाळीच घरी आले, काल बाबांची तब्बेत ठीक नव्हती असं कळलं मग सकाळीच निघून आले.”
“का? काय झालंय त्यांना?”
“थंडी ताप आहे. गोळ्या दिल्यात होतील बरे.”
“अग मग एक शब्द सांगायचं तरी, मी किती वेड्यासारखा फोन करत होतो, शेवटी मी रश्मीला फोन केलेला, मग मला कळलं की तू गावी आहेस म्हणून.”
“रश्मीला का फोन करायचा लगेच?”
“अग काळजी वाटली मला, बर ते जाउदे बाबांची काळजी घे, आणि काल मी उगाच चिडलो त्यासाठी सॉरी.”
“नाही, चूक माझीदेखील होती, म्हणून मीपण सॉरी.”
भर रात्री सूर्य उगवला होता आणि तो माझ्या दुःखांचं बाष्पीभवन करत होता. मी लगेच ठिकाणावर आलो, काळीज थंड झालं.
“परत कधी येशील?”
“आता काही सांगता नाही येणार, आणि आता इंटरव्ह्यूच पण कारण नाहीये. पण येईल दहा पंधरा दिवसांत.”
“दहा पंधरा दिवस?”

पहिलं प्रेम भाग ६: Love Marathi story


म्हणजे माझ्या मते एक पूर्ण युग, एवढे दिवस मी एकटा काय करू. पण आजपर्यंत तू एकटाच होतास. माझ्या मनाच्या सगळ्या चाव्या मी तिच्याकडे देऊन टाकल्या होत्या. तिच्या माझ्याशी वागण्यानुसार माझं इतरांशी वागणं अवलंबून होतं. आता काहीही झालं तरी तिला इकडे परत लवकरच बोलवायचं. लगेच युक्ती सुचली (नाक बंद झालं की तोंड उघडत म्हणतात ते असं) माझा एक मित्र कंपनीमध्ये कामाला होता, त्याला मी सांगितलं तुझ्या कंपनीतून इंटरव्ह्यूसाठी एक ई मेल आशा आय डी वर पाठवून दे, म्हणजे ती तर येईलच पण तिचे घरातलेदेखील लवकर सोडतील तिला. त्याने तसं केलं आणि थोड्या वेळात तिचा फोन आला,


“ऐक ना, मला इंटरव्ह्यूसाठी बोलावलंय परवा एका ठिकाणी, मी येईल उद्या परत तिकडे.”
माझं नियोजन यशस्वी झालं, पण मी जे खोटं बोललोय त्याच काय? बघू पुढचं पुढे, आता तर गोड बातमी ऐकली ना तेवढंच बस.
ती येणार पण मग इंटरव्ह्यूच काय, तर मी मित्राला आधीच सांगून ठेवलं, जर उद्या तुला याविषयी फोन आला तर सांग, ती जागा भरली गेली म्हणून. अरे किती अफरातफर ही, एवढं डोकं अभ्यासात चाललं असत तर गुणपत्रिकेवर सही घेताना बाबांचा मार चुकला असता.

उद्या ती परत येणार म्हणून पुन्हा माझ्या अंगात ऊर्जा आली, घरात देखील मी एक समजदार मुलासारखा वागत होतो. आई बाबांची आठवड्यापासून रखडलेली कामे करून टाकली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तिच्या गावावरून निघाली, आणि मी तिला घ्यायला बस स्थानकावर गेलो. ती बस मधून उतरली, माझ्या चेहऱ्यावरचा आनंद ओतू चालला होता, लगेच मी तिच्याजवळ गेलो आणि बॅग हातात घेतली, खरं तर तिला मिठी मारावी वाटत होती, पण माझ्यात तेवढी हिम्मत नव्हती. संध्याकाळी तिला भेटलो तेव्हा तिचा चेहरा पूर्ण पडला होता, आज माझ्या चंद्राला ग्रहण लागलं होतं, आणि तिच्या डोळ्यातून गंगायमुना दुथडी भरून वाहत होत्या.

“काय झालं?” मी विचारलं
“काही नाही इंटरव्ह्यू रद्द झाला, त्यांना कोणीतरी दुसरा माणूस भेटला, मग कशाला मला असं आशेवर ठेवायचं ना.” ती रडतच बोलली.
थोड्या वेळात मी तिला सावरलं, तिने मला मिठीच मारली आणि पुन्हा जोरात हुंदका दिला. आता नक्की काय करायचं ही अक्कल माझी बंद झाली होती. काही वेळाने ती शांत झाली,
“जाउदे ग, होतं असं. माझ्याविषयी तर कित्तेक वेळा घडलय असं.”

पहिलं प्रेम भाग ६: Love Marathi story


माणसं समदुखी असली की वाईट वेळ लवकर कापली जाते. मी तिला तिच्या रूम वर सोडवलं आणि घरी निघून गेलो. तस आज मी तिच्याशी अत्यंत चुकीच वागलो होतो, नंतर मलाच माझं वाईट वाटत होतं, पण ते दुःख गिळण्याची पचनशक्ती माझ्यात आजतरी होती. तिचा सहवास असावा म्हणून मी काहीही करायला तयार होतो, पण मनात काही नकारात्मक गोष्टी देखील चालू असायच्या, माझ्या आधी जर तोच तिच्या आयुष्यत परत आला तर? आणि ते दोघेही गेले पाच ते सहा वर्षे एकमेकांना ओळ्खताय म्हटल्यावर ते एकत्र येण्याची संधी देखील आहे. ते काहीही असलं तरी ती माझीच आहे, मी तिला माझ्या मनातलं सांगेलच लवकर. तेवढ्यात तिचा मेसेज आला की उद्या भेटशील का एक महत्वाचा विषयावर मला बोलायचं आहे तुझ्याशी. महत्वाचा विषय? काय असेल?
“आता सांग ना थोडं, काय आहे नक्की?”
“सांगेल ना उद्या.”
“पण आता जरा सांग ना.” मी अगदीच विनंती करू लागलो.
“जरा भविष्याचा आहे, एक निर्णय घ्यायचा आहे.”
“कशाविषयी पण?”
“अरे सांगते ना उद्या, मला भेट लवकर आपल्या नेहमीच्याच जागेवर.”
“हो भेटतो.”
काय असेल बरं? ह्या विचारात मी झोपून गेलो.
माझ्या मनात सध्या विचारांचा शिवतांडाव चालू झाला होता आणि ते शांत होण्यासाठी पूर्ण रात्र बाकी होती.………………………….TO BE CONTINUED

सातवा भाग हा शेवटचा असून तो २ ऑगष्ट २०२० ला प्रसारित होईल

पहिलं प्रेम भाग ६: Love Marathi Story

आपण वाचत होतात “पहिल प्रेम” या मराठी लघु कथेचा सहावा भाग. जर तुम्ही पुढील भागाची वाट पहात असाल तर आम्हाला नक्की कळवा आणि आमची हि कथा कृपया तुमच्या मित्रांशी शेअर करा.

Author – स्वप्नील खैरनार

Marathi Love Story

स्वप्नील खैरनार यांचे आणखी लिखाण वाचा – Marathi Poem On Love

Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा

9 thoughts on “पहिलं प्रेम भाग ६: Love Marathi story”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
26 + 3 =