काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री.रवींद्र आटे यांची -मैत्रीचे अर्धशतक!- हि कविता -Maitri On Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
मैत्रीचे अर्धशतक ! Best Maitri On Kavita

शाळेतील मैत्रीच्या आठवणी
असतात हृदयाच्या एका कोपऱ्यात
साठवलेल्या… गुंतलेल्या
शाळेच्या पहिल्या दिवसापासून
दहावी बारावीच्या
निरोप समारंभापर्यंतच्या
या आठवणी
कधीच विरघळून जात नाहीत
स्मरण पटलावरून…
जसजशी वर्षे
उलटून जातात
तसतशा आठवणी
आणखी घट्ट होत जातात…
अर्धशतकापूर्वीच्या शाळेतील
अशा घट्टआठवणी
मोजता येतील असे वाटते
पण सर्वच्या सर्वच आठवणी आठवल्यात तर!
दर दिवसाच्या व प्रत्येक
उन्हाळा पावसाळा व हिवाळ्याच्या
स्मृती जाग्या झाल्यात तर?
मला जशी माझी शाळा आठवते
तसेच वर्गातील व शाळेतील सर्व मित्र देखील आठवतात
एस पी कॅम्प प्राथमिक मराठी शाळा
पुलगाव कॅम्प पुलगाव
पाचवी ते दहावीपर्यंतची लेबर कॅम्प हायस्कूल
पुलगाव कॅम्प पुलगाव
या दोन्ही शाळेतील मित्र
आताही भेटतात हातातील
मोबाईल वरून
जोवर त्यांची डीपी बघितली नव्हती किंवा छायाचित्र बघितले नव्हते
तोवर त्यांचे अर्धशतकापूर्वीचे चेहरे डोळ्यासमोर यायचे
अशी कशी रे ही मैत्री मित्रांनो
मान्य आहे जीवनाचे विविध टप्पे असतात
प्रियजनांची ताटातूट अपरिहार्यच असते
पण मित्रांनो तुमचा शोध घ्यायला सुद्धा या निर्जीव मोबाईलची मदत घ्यावी लागली
पण केवळ दोघे तिघेच सापडलात
बाकीचे कुठे गेलेत?
भूतलावर असावेतच
निघून गेले असल्यास सांगूही नका मित्रांनो
अज्ञानाच्या भावविश्वातच मन रमू द्या
प्रिय मित्रांनो मला जेवढ्या आठवणी होत्या तेवढ्या मी अभिव्यक्त केल्या
तुम्ही सांगितलेल्या आठवणींची त्यात भरही पडली
पण या आठवणी केवळ शब्द रूपाने देत घेत आहोत
अर्धशतकापूर्वीचा अनुभवांचा ताजेपणा मात्र हरवून बसलोय
त्यावेळेसचे सूर्याचे उगवणे
सायंकाळी त्याचे मावळणे
चंद्राचे आगमन व त्याचा सकाळपर्यंतचा मुक्काम
शाळेतील राष्ट्रगीताच्या वेळी
झालेली धावपळ
गणिताच्या वर्गाची घंटा वाजता हृदयात भरणारी धडकी
दुपारच्या सुट्टीत
कडक
शिक्षकांचा ताण
घालविण्यासाठी
चणेफुटाणे वाल्या मावशीकडे मारलेला फेरफटका
व तोही दैनंदिन!
मुख्याध्यापक सरांचा तास संपेपर्यंत अभ्यास न केल्यामुळे वर्गातच आपला जीव गुदमरून जायचा
वर्गांना मोठमोठ्या अनेक खिडक्या होत्या तरीही!
मात्र पिटीचा तास हा शाळेचा तास वाटायचाच नाही…
घराकडील मैदानावर खेळल्यासारखे वाटायचे…
तुम्ही मात्र मला
तसेच मैदानावर सोडून
क्रिकेट खेळण्यासाठी
डेपोच्या भिंतीकडील वाहत्या नाल्याच्या बाजूच्या मैदानावर
निघून जायचे.
तुमच्या सोबतच्या एनसीसी
तसेच स्काऊटच्या आठवणी
बऱ्याच आहेत
एनसीसी चा कॅम्प व
स्काऊटचे श्रम शिबिर आठवत असेल!
आपण दोघे तिघे भैरव बाबाच्या मोठ्या मंदिरात कित्येकदा गेलो असणार!
भैरव बाबाच्या टेकडीवर राम सीताच्या पादुका कोणी बनवून ठेवल्यात असा प्रश्न आता
मनात येतो
तेव्हा त्या खऱ्याच वाटल्या होत्या!!!
आपल्या प्राथमिक शाळेच्या बाजूच्या क्लबच्या कोपऱ्यावर
भीम जयंती चे किती सुंदर कार्यक्रम व्हायचे! नंतर थोडा शेजारीच नवीन रंगमंच निर्माण केला. नागपूरच्या कादर ऑर्केस्ट्रा ची तसेच अमरावतीच्या संगम आर्केस्ट्रा ची किती गाणी तिथे ऐकली असतील.
आठवते मित्रांनो
आपल्या एसपी कॅम्प मधील गायक कलाकार तसेच अभिनय करणारे कलाकार किती तळमळीने त्यांची कला सादर करायचे.
आपला पहिला वर्ग दुसरा वर्ग तिसरा वर्ग व चौथा वर्ग नेमका कोणत्या कक्षात भरत होता? आठवते?
आपण शाळेच्या आवारात सकाळी राष्ट्रगीत म्हणायचो तेव्हा आपला चेहरा कोणत्या बाजूने असायचा?
शाळेतली बसण्याची पट्टी आठवते काय?
नवीन पुस्तकांना उघडल्यावर अपरिचित वेगळाच गंध जाणवायचा त्याचे स्मरण होते?
मैदानावरील दोन्ही डबल बार आठवतात?
एक डबल बार थोडा कमी समांतर होता ते आठवते? होळी रंगपंचमी आठवते काय मित्रांनो?
आपल्या नोटबुकांवर तेव्हा राजेश खन्ना शशि कपूर सुनील गावस्कर हेमा मालिनी मुमताज
बॉबी डिंपल ऋषी
यांची चित्रे असायची
फक्त कॅरवानच्या नोटबुकावर निसर्गाची चित्रे असायची.
पण आपल्या अखत्यारीतील
ही बाब नसल्याने
शिक्षक त्याबद्दल कधी रागावल्याचे आठवत नाही
आपल्या डेस्कवर शाळेची स्थापना झाल्यापासून
शेकडो विद्यार्थ्यांनी पेनाने किंवा खिळ्याने बरेच काही साहित्य व नावे लिहून ठेवलेली असायचे!!! आपणही त्यात थोडीफार भर नक्कीच टाकली होती
पुन्हा त्यावरच आता ही दीर्घ कविता लिहीत आहे!!!
आपल्या शाळेच्या बँड मध्ये तुम्ही भाग घेतला होता
मी भाग घेतल्याचे फारसे आठवत नाही
पण बासुरीवर सुन चंपा सुन तारा
हे कसे मला वाजवता येते?
तुमच्याकडूनच बासुरी मी घेतली असावी शिकण्यासाठी!
मित्रांनो आपण एसपी कॅम्पच्या टेकडी वरून मारवा कंपनी… इ पी बॅरेक्स
नंतर रस्ता ओलांडून शेतातून गेट क्रमांक अठ्ठेचाळीस कडून शाळेत जायचो
कधी कधी थोडा यात बदल करून वाचनवाड कडून…
मला अजूनही कळले नाही तू राहत होता त्या भागाला पोलीस लाईन किंवा वाचनवाड का म्हणायचे
सैनिकी क्षेत्रात पोलिसाचा काय संबंध
वार्डचे एकदम वाड केव्हा झाले?
एस पी कॅम्प म्हणजे साउथ पॉईंट कॅम्प हे आता तू मला पन्नास वर्षानंतर सांगतो! तेही वडिलांनी सांगितले म्हणून!!!
त्यामुळेच इ पी बॅरेक्स म्हणजे ईस्ट पॉईंट बॅरेक्स हे सर्वसामान्य ज्ञान मला झाले!
आता आपल्या शाळेतील फक्त दोन शिक्षक व एक शिपाई हयात आहेत
कितीतरी वर्षांपासून या सर्वांना व तुम्हा सर्वांना भेटतो भेटतो म्हणून राहूनच गेले…
आताही कुठे भेटलोत ?
कविता लिहून झाले की तुम्हाला पाठवणारच आहे
तीच आपली अदृश्य भेट!
अरे मित्रांनो एसपी कॅम्पचे बिहाड्याचे झाड आठवते काय?
मी अलीकडेच परवानगीने जाऊन आलो. त्याचे फोटो घेतलेत.
जुना मित्रच भेटल्यासारखा वाटला
खूप जीर्ण झाला आहे रे तो!
आपली शाळा ही तोडली आहे
तिची शेवटची पदचिन्हे मात्र मी कॅमेऱ्यात टिपून घेतली.
पुन्हा तिची भेट होते ..नाही होत…
आपली लेबर कॅम्प शाळा देखील आता राहिली नाही. झाडे लावलेली दिसलीत
पण दुःखी होण्याचे कारण नाही
या दोन्ही शाळा
आपले एस पी कॅम्प
लेबर कॅम्प
भैरव बाबाची टेकडी व मंदिर
त्या शेजारी असलेले सुंदर बुद्ध विहार
निसर्गरम्य ठिकाणी असलेली दोन्ही मारुती मंदिरे
एस पी कॅम्पची टेकडी पीर बाबाची टेकडी
कवठा झोपडी
चिटकी झोपडी
रावण दहनाचा व भैरव बाबा रंगमंचावरील कार्यक्रमांचा
आठवणींचा ठेवा नेहमीच सोबत राहणार आहे
गारिसन टॉकीज.. चित्रा व श्री टॉकीज.. पुलगाव चे रेल्वे स्टेशन
पुलगावची वर्धा नदी
नदीच्या तिकडे असणारा अमरावती जिल्हा
शाळेची नागपूर रामटेक ची ट्रिप
शाळेतील प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका पुरवणी बांधावयाचा धागा
क्राफ्ट च्या वर्गात शिकवलेली
तुरपाइ धावदोरा धाग्याची गुंडी
दोन रेषा व चार रेषांची वही आलेखाची वही
शाळेचे दप्तर
प्राथमिक शाळेतील पाटी
लेखनी व टाक
आपल्या शाळेची प्रयोगशाळा
पाण्याचा माठ
अत्यंत कडू चव असलेली मेंदी
चणे फुटाणे गोळ्या बिस्किटे बिस्किटांचे आकार
त्यावरील प्राण्यांची व इतर चित्रे
गणपती उत्सवात घेतलेली खेळणी एकेक करून आठवा
बालपणाच्या रम्य जगात
प्रवेश होईल
कशाला ध्यान लावून बसता
चला की एकदा
अस्तित्वात नसलेल्या शाळेतील भिंतींना स्पर्श करून बघू
तू ये मित्रा
तू पण ये
अरे हो तू पण ये व त्याला पण घे
शेवटच्या पालखीत बसण्यापूर्वी असे अमृतमयी काहीतरी करावयासच हवे!!!

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
Chhan