पहिलं प्रेम भाग ५: First Love Marathi
“जाउदे कट कर, नाही उचलायचा मला.”
मी लगेच कट केला, पण त्याचा फोन पुन्हा पुन्हा येतच होता.
“तू एकदा उचलून बोलूनच घेते का? म्हणजे पुन्हा नाही करणार तो.”
“ठीक आहे, आता आला की उचलते.”
पुन्हा फोन आला आणि तिने उचलला,
सह्याद्रीचा जो कडा मला दिसत होता त्यावरून मी मला पडताना पाहिलं. हा बावळट का परत फोन करतोय.
त्यांचं संभाषण सुरू झालं,
“हॅलो, काय रे, का फोन करतोय सारखा?”
थोड्या वेळाने तिने फोन ठेवला, पण ती जरा चिंतेत होती.
“काय म्हणाला तो?”
“रडत होता, तू पुन्हा माझ्याकडे ये, पुन्हा अस नाही करायचं आशा विनवण्या करत होता.”
मी कड्यावरून पडलो नाही तर मी दगडावर अपटलो देखील होतो.
“मग तू काय बोललीस?”
“ते शक्य नाही असं स्पष्ट सांगितलं त्याला. पण आज मी त्याला पहिल्यांदाच एवढं रडलेलं ऐकलंय.”
“मग आता, तुझा काय विचार आहे?”
“जाउदे ते सोड ना, एवढ्या मस्त जागी आलोय तर कशाला हे फालतू विषय हवे!”
आजपर्यंत भरपूर गोष्टींना ‘जाउदे’ नावाची पदवी बहाल झाली होती.
आज तिने मला पूर्ण तिची आणि त्याची कहाणी सांगितली, आणि मी ती बारकाईने ऐकली, करण तिला त्याच्या ज्या चुकांचा त्रास झाला त्या मला अजिबात करायच्या नव्हत्या.
तिथे मी तिच्यासोबत पहिल्यांदा फोटो काढले. दिवस मार्गी लागला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आज तिच्या बऱ्याच दुःखांना मी खांदा देऊन स्मशानभूमीत दफन केलं होतं, आणि त्यामुळेच तिची माझ्यापरी असलेली ओढ वाढली असावी.
थोडा वेळ पुढे गेल्यावर तिने मागच्या बाजूने मला घट्ट पकडले आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं.

पहिलं प्रेम भाग ५: First Love Marathi
“तो क्षण मला झेपावत नव्हता,
ती गोष्ट मला समजत नव्हती,
तो स्पर्श मला कळतच नव्हता,
माझ्या अस्तित्वावर आज मला विश्वासच नव्हता…”
आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी मला इतक्या प्रेमाने पकडलं होतं. मनातल्या खूप गोष्टी बाहेर येण्यासाठी सज्ज झाल्या होत्या, पण मी जरा ठिकाणावर असल्याने त्या बाहेर आल्या नाही. अजून प्रेम वगैरे ह्या गोष्टींना शिकमोर्तब नव्हता, पण एक विश्वासाच्या नात्यामुळे हा क्षण मी त्याआधीच अनुभवला होता. आजचा दिवस संपला, दोघांनाही घरी जायची इच्छा नव्हती, कशी असणार आजचा दिवसच तसा होता. तिच्यापेक्षा मी जास्तच खुश होतो. तिला घरी सोडवलं आणि मी मुकाट्याने घरी जायला निघालो. घरी पोहचल्यावर लगेच तिला फोन केला, आणि पुन्हा आजच्या दिवसात जाऊन आलो. आता मी तिला कधीही फोन मेसेज करू शकत होतो, मला परवाना भेटला होता. माझ्यासोबत काहीही घडले तरी मी लगेच तिला सांगायचो, आणि माझ्या मते ती देखील तसच करायची. पण चांगले दिवस लवकर निघून जातात कारण ते चांगले असतात. आणि एके दिवशी…
तिच्यासोबत बागेत बसलो होतो, जागा नेहमीचीच होती आणि गप्पा सुध्दा. त्याच वेळी तिने एक विनोद दाखवायला मला तिचा मोबाईल दाखवला, ते पाहून मी हसलो खरा पण तिच्याकडून चुकून एक स्पर्श झाला आणि ती मेसेज विंडो मला दिसली, त्याच्या नावासकट. मला घाबरल्यासारखं झालं, मी जे पाहिलं ते खरं आहे का हे पडताळणीसाठी तिला लगेच विचारलं,
“तो अजून संपर्कात आहेच का तुझ्या?”
“कोण तो?”
“तोच!” मी जरा रागातच बोललो.
“नाही, पण असा अधूनमधून मेसेज करत असतो. मी नाही बोलत पण त्याच्याशी.”
“पण मी काय म्हणतो, तू त्याला कायमचंच सोडून का नाही देत?”
“अरे असं काय करतो, मी बोलत नाही ना त्याच्याशी.”
“तू नसली बोलत तरी तो तुझ्याशी बोलतोच ना?”
“त्याने काय एवढा फरक पडतो!”
“फरक पडतो?” मी आश्चर्याने विचारले.
“हो, जाउदे ना तो विषय, दुसरं बोल.”
“काय बोलू आता?” मी नाराजीने बोललो.
“तू नको रे एवढी काळजी करू, मी हाताळेल त्याला बरोबर.”
नेहमीचीच पळवाट झाली होती तिची. मला असं वाटतंय का जाऊन एक कानाखाली वाजवावी त्याच्या, हे लपंडाव का खेळायचे उगीचच.
“अग हाताळण्याचा प्रश्न नाहीये, तू विसरून का नाही जात?”
“विसरून? काहीही झालं तरी पहिलं प्रेम आहे रे ते, असं सहजासहजी कसं विसरू मी?”
हे वाक्य ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली, पहिलं प्रेम? एवढं विशेष असतं का? म्हणजे ती त्याला कधीच विसरू शकणार नाही?
“याचा अर्थ तू नेहमीच संपर्कात राहशील का त्याच्या?”
“संपर्क नाही रे, एक आठवण म्हणून राहील तो फक्त, आणि हळूहळू जाईल पण निघून. तू सोड ना तो विषय, का एवढ्या गप्पा करायच्या त्यावर.”
आता सांगू कसं तुला, तुला नसेल पडत फरक पण माझ्या पूर्ण आयुष्यात फरक पडतोय.
‘आता आशा वेळी नाही तिची चूक नाही माझी आणि नाही त्या मनोजची, पण वेळ असते ना ती एखाद्या सरड्याप्रमाणे रंग बदलत असते. आणि तिच्या त्या बदलत्या रंगात माणसांनाही बदलायला भाग पाडते.’
त्याचा आणि तिचा संपर्क माझं काळीज जाळत होता, पण तुला तुझ्या प्रेमावर विश्वास आहे की नाही? तिला तू एवढं प्रेम दे की त्याची आठवनच यायला नको. पण यावर उपाय एकच, माझ्या मनात मला तिच्याविषयी काय आहे ते सांगून टाकायचं. नको घाई होईल, आणि आहे त्या चांगल्या नात्याला गालबोट लागेल. सध्या तिचा फोन झाला की त्यामध्ये कमीतकमी एक वाक्य त्याविषयी मी विचारायचो आणि ती त्याच वेगाने ते टाळायची. पण त्याच्या कारणाने आमच्यात सध्या भांडणं सुरू झालेली. माझं एकच मत असायचं की तू त्याला विसरून जा, आणि तीच देखील एकच, मी विसरेल पण मला वेळ हवाय. पण आता गेले ना एवढे दिवस, एवढा वेळ लागतो का विसरायला?
पहिलं प्रेम भाग ५: First Love Marathi
एकदा मात्र पाणी डोक्यावरून गेलं, मी तिला फोन लावला आणि तिचा फोन व्यस्त लागला, मी पुन्हा दहा मिनिटांनी फोन लावला तरीही व्यस्त, स्पष्टपणे त्याचाच फोन असणार! थोड्या वेळाने तिचाच फोन आला,
“हॅलो, बोल, काय म्हणतोस?”
“कोणाचा फ़ोन होता?”
“कोणाचा नाही रे बोल ना जेवलास का?”
“फोन कोणाचा होता?” माझा आवाज उंचावला.
“मनोज होता.”
“इतका वेळ?” मी रागात विचारले.
“तो खूप त्रास करून घेत होता स्वतःला, माझ्याशी बोल म्हणत होता, मग बोलले जरा वेळ.
“वेडी आहेस का ग? तुला सांगितलं ना की त्याला फोन करायचा नाही. का वागतेस असं?”
मी पूर्णपणे रागात होतो.
“हॅलो, अरे तू का इतका संताप करतोय? मी बोलले ना तुला मी हाताळते सगळं, मग का रागावतोय.”
“मला त्रास होतो ना या सगळ्याचा!”
“तुला का त्रास होतोय?”
“काही नाही तुला नाही कळणार. बोलत रहा अजून त्याच्याशी.” आणि मी रागात फोन ठेऊन दिला.
मला नाही फरक पडणार काही, कशाला एवढी काळजी करायची ना, एखाद्याला नाही समजत तर नाही. पण खरंच मला काही फरक पडणार नव्हता का?
तिचे मला फोन येत होते आणि आज पहिल्यांदाच माझ्या फोनवरचं तिचा फोन फेटाळून लावण्याचं बटन चालू झालं. मी तिचे चक्क दोन वेळा फोन कट केले, त्यानंतर तिने केलेच नाही. मी शांत झालो, आणि मला आता जास्तच तिची आठवण आली. मी तिला फोन केला,
“का करतेय फोन?”
“अरे असा काय वागतोय अचानक? काय झालंय तुला?”
“मला काही नाही झालं, दुसरं बोल.”
“तू ठीक आहेस का नक्की.”
“हो आहे मी ठीक, पण तुला काय करायचं त्याच, तू बोल त्याच्याशी.”
“तू का पुन्हा तोच विषय घेऊन येतोय? मला नाही बोलायचं, ठेवते मी फोन.”
“हो ठेव.”
पहिलं प्रेम भाग ५: First Love Marathi
त्या रात्री मी तिच्याशी बोललोच नाही, पण मनात राहून राहून एक विचार यायचा, आपल्या भांडणामुळे तो जर अजून तिच्या जवळ गेला तर? मला पुन्हा भीती वाटली, माफी मागू का तिची? चूक तिची आहे ना?आणि गरज तुला आहे? पण गेल्या काही दिवसात ती जिथे राहायची तिथे असलेली तिची मैत्रीण संपर्कात आली होती, आणि आम्ही एकमेकांशी बोलतो, भेटतो हे सुद्धा बऱ्या प्रमाणात तिला माहीत होतं. मग तिला समजवण्यासाठी मी तिच्या मैत्रिणीचा आधार घेतला, आणि तिला आहे त्या घडलेल्या गोष्टी सांगून तू तिला समजावं की त्या मनोज ला फोन वैगेरे करण्याची काहीच गरज नाही. त्या रात्री मी तिच्याशी न बोलताच झोपी गेलो.
दिवस उजाडला, मोबाईल हातात घेतला, तिचा एकही मेसेज नव्हता. सकाळ झाली होती पण मी मात्र अंधारातच होतो.
जेव्हा तुम्ही एखाद्या दुःखात असता तेव्हा हा सकाळी जाग आल्यानंतरचा काळ असतो ना तो खूप वाईट असतो. रात्रभर शांत असलेल्या तुमच्या डोक्याला सकाळी तुम्ही जो विचार देता तसाच तुमचा दिवस असतो, आणि कालच्या भांडणामुळे माझ्या डोक्यात सकाळपासूनच विचित्र विचार चालू झाले, डोकं अचानक जड पडलं, मी अंथरुणातून उठलो आणि सरळ बाहेर जाऊन उभा राहिलो, आता जरा बर वाटत होतं, पण तीच काय? वाट पहायची का? म्हणजे जी व्यक्ती आपली वाट लावत असते तिचीच वाट आपण बघत असतो. नको, मीच करतो मेसेज तिला,
“गुड मॉर्निंग!”
तिचा मेसेज आला नाही, मग थोड्यावेळाने मी तिला फोन केला, तोही तिने उचलला नाही, माझी धकधक वाढत होती, मला तिची काळजी वाटत होती, नक्की काय झालं असेल? एरवी दोन रिंगस् मध्ये फोन उचलणारी ती, कालच्या भांडणामुळे झालं असेल का? नाही, तस काही नसेल. मी पुन्हा फोन केला तरीही ती उचलत नव्हती. मी न राहून तिच्या मैत्रिणीला फोन केला, तिने मात्र उचलला,
“अग कुठे आहे ही? किती वेळ झाला फोन करतोय.”
“ती तर सकाळीच तिच्या घरी गेली गावाला, तुला सांगितलं नाही का तिने?”
“गावाला? का?”
पहिलं प्रेम भाग ५: First Love story Marathi
आपण वाचत होतात “पहिल प्रेम” या मराठी लघु कथेचा भाग ५. जर तुम्ही पुढील भागाची वाट पहात असाल तर आम्हाला नक्की कळवा आणि आमची हि कथा कृपया तुमच्या मित्रांशी शेअर करा.
Author – स्वप्नील खैरनार

स्वप्नील खैरनार यांचे आणखी लिखाण वाचा – Marathi Poem On Love
Very nice story …. waiting for next part…?????
Yaar Swapnil, Can’t wait:( please end this story now I am dying to read climax.
Superb
Waiting for next Part???