Rajgad Fort
मी आणि संजीवनी..
राजगडावरच हे प्रकरण आयुष्यात खूप काही शिकवून जात.. तस तर संपूर्ण राजगडच स्वर्गासम आहे, पण त्यातही संजीवनी थोडी खासच.. सह्याद्रीतल्या हक्काच्या जागांपैकी एक.. राजगडावर आजपावेतो असंख्य वेळा गेलोय, अगदी विविध वाटांनी पण ओढ मात्र एकच असते जिवाभावाची संजीवनी..
या वेळेसही दुपारी गड चढून वर आलो.. पद्मावतीस दोन क्षण दवडून ४.३० च्या सुमारास पोहोचलो तेव्हा गर्दीच्या गराड्यात अडकलेली तरीही उजळून निघालेली ती स्वराज्यलक्ष्मी तेव्हाही उजळून दिसत होती.. यावेळी टेहळणी बुरुजाऐवजी थेट माचीच्या टोकावरच्या चिलखतीवर बसून सह्यपसाऱ्यात अलगद विरणाऱ्या त्या जगत्मित्राला रायगडाच्या बाजूस निरोप दिला.. एव्हाना माचीवरचा गोंगाट शांत झाला होता.. गर्दी हळूवार पांगली.. माकडांचीही आता परतवणी झाली होती.. लांबवर पश्चिमेस गुलाबी रंगाची उधळण करत सह्याद्रीची होळी चालली होती.. त्या नजाऱ्याने मंत्रमुग्ध होत आता मी त्या रूपगर्वितेच्या माचीवर येऊन बसलो.. कधी विचारही न केलेल्या स्वप्नाचीच जणू सुरुवात होती..
Rajgad Fort Trek
पाखरांचा किलबिलाट कमी होऊ लागला.. अंधाराच साम्राज्य पसरू लागल.. माचीवरून दिसणारा बालेकिल्लाही अलगद त्या अंधारात गुडूप होत होता.. आताशा फक्त मी आणि संजीवनी दोघच होतो.. कोणत्याही हालचालीचा मासगूसही नव्हता.. जोरदार हवेच्या तालावर फडफडीत तो भगवा ध्वज आमच्या गप्पांना साक्षी होता.. ते गप्पाष्टक रंगवायला आकाशात तारकांनीही उधळण चालू केली होती.. बरच काही बोललो.. मनातल्या शब्दांना वाट मोकळी करून दिली.. हवेतला गारवा अंगावर शहारे आणेल एवढा, पण कुस संजीवनीची होती.
Rajgad Fort Trek
रात्री ९ च्या सुमारास वारा मंदावला, बालेकिल्ल्याच्या मागून तृतीयेचा चंद्र वाट काढू लागला, मग काय गप्पांना आणखी एक जोडीदार.. त्या असीम शांततेत भंग पाडणार कोणीच नव्हत.. न म्हणायला रातकिड्यांच पार्श्वसंगीत आणि मधेच एखादी मंजूळ सह्यवाऱ्याची झुळूक एवढाच काय तो आवाज.. घड्याळाकडे सहज लक्ष गेल तेव्हा रात्रीचे ११.३० वाजले होते.. रोहित आणि अमित मध्यरात्री येणार असल्याने ६ तासांची ती मैफिल नाईलाजास्तव आटोपून पावलं वळाली, त्या शांततेतून थेट मुन्ना बदनाम हूआ वाजत असलेल्या पाली दरवाज्याकडे.. त्या गर्दीत मी नव्हतोच.. सकाळ झाली पुन्हा एकदा संजीवनी गाठली.. सकाळच्या उन्हात तर तिच सौंदर्य आणखी उजळून निघालेल..
गुंजवणी दरवाज्याने गड ऊतराई करून पुण्याच्या वाटेला निघालो.. अतृप्त मनानेच.. कालचा तो हवाहवासा वाटणारा एकांतवास डोळ्यासमोर पुन्हा एकदा उलगडत.. आणि मनात खंबीर पणे जगायला शिकवणारी ती ४ अक्षरे.. सं जी व नी..
Author- स्वप्निल खोत

Rajgad Fort Trek