Navra Bayko

अरे बापरे… शीर्षक वाचल्या क्षणी तुम्हाला वाटलं असेल याला आज काय विषय काढायची गरज होती. आमचं आम्हाला माहित रोजचे दिवस कसे चालू आहेत ते. “अहो ऐकलं का…?” हे ऐकताच नवऱ्याच्या कपाळावर घड्या पडतात. आता काय काम करावं लागणार आहे याचाच विचार लगेच डोक्यात येतो

पण विचार येतो की थोडा वेळ तिला दिला तर काही नाही होणार, कारण ती जे काही करते ते आपल्यासाठीच असतं, आणि तिला तर त्यातच आनंद भेटत असतो. हे सगळं आपल्याला माहित असूनही आपण आपल्याच दुनियेत मस्त असतो.

नवरा बायकोचा नातं हे विश्वासावर असते हे तर सगळ्यांनाच माहिती आहे तरी आपण सगळ्या गोष्टी सांगायला टाळतो अथवा घाबरतो. ती सरळ अर्थाने समजून घेणार नाही हे लक्ष्यात येत, काय शेवटी लपवावाच लागतं. आणि चूक केली असेल अथवा झाली असेल ती लपवता लपवता नाकी नऊ येतात.

खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा भांडण सुरु होतं. सुरवातीला नवरोबाचा आवाज कडक असतो, एकदम वजनदार, असं वाटतं आता ही बोलूच शकणार नाही, पण….पण म्हटल्यावर तुमच्या लक्ष्यात आलंच असेल पुढे काय होतं ते. शेवटी गप बसावच लागतं.

बायको माहेरी गेल्यावर काय आनंद होतो ते नवऱ्यालाच माहिती. पण हा आनंद जास्त वेळ टिकत नाही. बायको असल्यावर घर घरा सारखं भरलेलं वाटतं. ती गेल्यावर २-४ तासातच तिची आठवन यायला सुरवात होते.

ओढ दोन्ही बाजूने असते पण ती माणूस दूर गेल्यावरच समजते. आपलं माणूस म्हणून आपण कोणाचा विचार करतो तर ते म्हणजे नवरा बायको. जीवनात सुखाचा आनंद घायचा असेल तर माणसाने लग्न केलंच पाहिजे आणि गोड भांडण तर नक्कीच करायला हवं.

बायकोची नवऱ्याकडून खूप मोठी अपेक्षा कधीच नसते. तिला फक्त समजून घेणारा आणि प्रेमाने मिठीत घेणारा नवरा हवा असतो. माहेर सोडून आल्यावर तिच्या जवळचा कोणी माणूस असेल तर तो म्हणजे नवरा. ती आपलं संपूर्ण जीवन त्याचा सोबत घालवणार असते.

ऑफिस मधून आपण ज्यावेळी घरी येतो त्यावेळी तिच्या चेहेऱ्यावर जो आनंद असतो तो खरंच बघण्यासारखा असतो. तिच्या हाताचा चहा पिताना दिवसभरचा थकवा कसा निघून जातो ते समजत नाही. मग तिच्या दिवसभरच्या गोष्टी सुरु होतात.

समजून घेतलं तर माणूस कायम सुखी राहील आणि आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या बायको सोबत घालवायचा विचार येईल. बायको म्हणजे तर आपलं हृदय, हसू येईल पण ही गोष्ट खरी आहे. तिच्या शिवाय आपलं एक पान देखील हालत नाही.

सकाळी उठवण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपली सगळी कामे तीच करते. ऑफिसच काम सोडलं तर खरंच विचार करा की आपण कुठलं काम करतो. न आपण स्वतःचे कपडे धुतो न स्वतःच्या कपड्याना इस्तरी करतो. ही छोटी काम पण आपण तिच्या कडूनच करून घेतो.

एकमेकांच्या चुका काढण्याऐवजी एकमेकांना समजून घेतलं तर बऱ्याच गोष्टी सुरळीत चालतील. त्यामुळे समजुन घ्या आणि आपलं एकमेकांवरील प्रेम कायम वाढत राहूद्या.