निसर्ग हा सदैव सभोवताली असतो पण त्याचे अस्तित्व नेहमी जाणवेल असं नाही. निसर्गाच्या कविता | Nisarg Kavita in Marathi ज्यातून निसर्गाचे अस्तित्व कळण्यास मदत होते.
तू तसा ओळखीचाच :- Nisarg Kavita in Marathi

तू तसा ओळखीचाच…
पण प्रत्येक वेळी नव्याने भेटणारा!
तुला पाहताच वाटतं…
मातीच्या दर्पात न्हावं
सुगंधी करावं मनाचं दर्पण
खिडकीशेजारी बसावं
अन् लिहावं एखादं काव्य!
अचानक येणारा तू…
पानांवर रोमांच करत
वसुंधरेच्या मिलनासाठी
सैरवैर सर्वत्र धावत
नशीबवान आहे निसर्ग
प्रत्येक वेळी तुला बिलगणारा
त्याच उत्कटतेने, अधिरतेने
जमतं त्याला प्रत्येक वेळी
तुला नव्याने भेटणं
करतो तो स्वीकार सर्वस्वाचा
तू तसा ओळखीचाच
तरी सदैव अनोळखी
वाटतो प्रियकरासारखा
प्रियासाठी अधिर
कधी पहिल्या भेटीसाठी आतुर
तर कधी विरहात कोसळणारा!
विरून जाऊ दे :- निसर्गाच्या कविता

एक तरी कविता तुझ्यावर करावी विचार येताच
अडगळीत पडलेले शब्द येतात बाहेर
ओढ तुझी मनाला लागलेली असताना
तू येतोस अन बेधुंद, बेभान बरसतोस
निरंतर सहवासाने व्याकुळलेली असते वसुंधरा
तारुण्यात जे प्रेम होतं ते वृद्ध होत नसल्याचे
चिरकाल राहत असल्याचे चित्र तू मला दाखवतोस
खूप वर्षांनी भेट व्हावी तसं तिला बिलगतोस
तू भेदभाव, परकेपणा यांपासून लांब पळतोस
सगळ्यांना समदृष्टीने ओलेचिंब करून टाकतोस
पहिल्या पावसाचा सुगंध मातीतून दरवळतो
इवलंसं रोप तुला पाहण्यासाठी डोकावते
निसर्ग बघून वाटतं आपण विरून जायला हवं
विरून जाऊ दे आता तुझ्यात, तुझ्या प्रत्येक थेंबात!
आमच्या इतर कविता वाचा
Romantic Marathi Prem Kavita | पावसातील स्पर्श | पाऊस कविता
“सांजवेळ होता दारी” कधीही न ऐकलेली कविता | Poem on Evening In Marathi Beautiful Kavita 2023
व्यथा
व्यथा तरी मांडू कशा?
डोळ्यात साठलेल्या महापूराच्या!
निसर्ग राजा असा कोपला
घाव त्याने बळीराजावर घातला
मांडताना या व्यथेला
शब्द अन अश्रू पडले अपुरे
मेहनत वाया जाताना
अंदाज ठरले सुमारे!
उभे राहिले फक्त प्रश्न…
दिन-रात राबलेल्या हातांच्या समोर
चार-दोन पैसे मिळतील या आशेच्या समोर
थकलेल्या, झिजलेल्या देहाच्या समोर
प्रश्न कर्जाचे
प्रश्न पोटाचे
प्रश्न जगण्याचे!
तो आणि पाऊस….

चातकासम अधिरतेने वाट पाहताना
आज आवडीचा पाऊस उदास वाटला
आठवणींच्या आठवांत भिजताना
मातीचा दरवळही न दाटला
क्षणभर मधुर क्षण आठवताना
पावसात चिंबचिंब न्हाले
यातनेच्या यज्ञात पडताना
पावसाची सर मी जाहले
तो आणि पाऊस दोघे आवडीचे
त्याच्या नसण्याला दोष का द्यावा?
क्षणभर आणि क्षणभंगुर असा
कदाचित तो सुगंध प्रीतीचा असावा!
कवियत्री :- मयुरी प्रसाद खानविलकर,
मु. पो. अंबवडे (बु),
ता. जि. सातारा.
मो. ८३८१०९११७४